Ajit Pawar & Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलंल काय, फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपदे किती आली किती गेली. छगन भुजबळ संपला नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी चार दिवसांपूर्वी मला फोन केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.


छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाराजीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तुमच्याशी संपर्क साधला का? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, शिर्डीच्या अधिवेशनासाठी मला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी येण्याची विनंती केली होती. तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो. चार दिवसापूर्वी अजित दादांचा सुद्धा मला फोन आला होता. मी उशिरा फोन करतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपण एकदा बसून बोलूया, असं अजित पवारांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.   


भुजबळांचं मिश्कील वक्तव्य


अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरु असताना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तुमची नाराजी दूर झाली आहे का? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम होते. त्यामुळे मी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. कोणी म्हणतो नाराजी कमी झाली तर का कोणी म्हणतो नाराजी वाढली, त्याचे थर्मामीटर लावून पाहिले पाहिजे, म्हणजे नाराजी कमी झाली की जास्त झाली हे समजेल, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले. अजित पवार यांच्याकडून तुमची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का? असे विचारले असता मला त्याबाबत काहीही विचारू नका, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला


Chhagan Bhujbal : संजय राऊत म्हणाले वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं गाडलीत, छगन भुजबळांना हसू आवरेना, म्हणाले, गाडली असतील तर बाहेर काढा..