Karuna Sharma on Bandra Court Result : मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं असून त्यांच्या पत्नी करूणा शर्मा यांनी केलेले सर्व आरोप कोर्टानं मान्य केले आहेत. तसेच, कोर्टानं धनंजय मुंडे यांना करूणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, या निकालानंतर करूणा मुंडे यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया दिला. 


एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या की, "न्यायालयाचे मी खूप आभार मानते, आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की, कोर्टात न्याय मिळत नाही. पण, मला न्याय मिळालेला आहे. यापूर्वीही औरंगाबाद कोर्टानंही मला दिलासा दिला होता. आजही माझ्या बाजूनं निकाल लागला आहे. त्यामुळे मी न्यायालयाची खूप खूप आभारी आहे." 


"माझी मुलं माझ्यासोबत आहेत, त्यामुळे आम्हा तिघांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळतील, अशी दरमहा 15 लाख रुपये मिळावेत, अशी मागणी होती. पण, आम्हाला न्यायालयानं दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे.", असं करुणा शर्मा म्हणाल्या. 


पुढे बोलताना करुणा शर्मा भावूक झाल्या, बोलताना त्यांना रडू कोसळलं, त्या बोलताना म्हणाल्या की, "महिलांना खूप त्रास दिला जातो. गेली तीन वर्ष मी यासाठी लढा देत आहे.  मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही की, मी कोणत्या त्रासातून या काळात गेली आहे. माझे पती आता माझ्यासोबत नाहीत. माझा लढा त्यांच्याविरोधातच नाही, अशा परिस्थितीत हा लढा माझ्यासाठी सोपा नव्हता. त्यातही माझे पती खूप मोठ्या पदावर आहे, संपूर्ण व्यवस्था त्यांच्यासोबत आहे, अशा परिस्थितीत हा लढा माझ्यासाठी सोपा नव्हता. खूप-खूप कठीण होता हा लढा माझ्यासाठी. खूप मोठमोठे वकील माझ्या वकिलांच्या समोर युक्तिवाद करण्यासाठी उभे होते. त्यामुळे मी माझ्या वकिलांचे खूप आभार मानते."


"माझ्या बाजूनं बीडचे वकील गणेश कोल्हे युक्तिवाद करत होते. त्यांनी एकही रुपया न घेता, हा खटला कोर्टात दाखल केला आणि आज आम्हाला विजय मिळाला. हा सत्याचा विजय मिळाला. एक महिला असताना एवढ्या मोठ्या शक्तीसमोर लढणं खूप अवघड झालं आहे. कारण त्यांच्यासोबत खूप मोठमोठे राजकारणी होते आणि माझ्याोसोबत माझा एक सर्वसाधारण वकील होते. न्यायाधीशांनी माझी बाजू घेतली. पण, ज्या माझ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यासाठी मी हायकोर्टाचं दार ठोठावणार आहे.", असं करूणा शर्मा म्हणाल्या. 






करुणा शर्मांचं अभिनंदय करणारं अंजली दमानिया यांचं ट्वीट 


"करुणा मुंडे या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस  जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.", असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.