Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (Savitribai Phule jayanti) साताऱ्याच्या नायगावातील कार्यक्रमात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे कौतुकही केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नायगावात सुरू झाला होता. छगन भुजबळ हे दरवर्षी नायगावात येतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला. नायगाव येथील कार्यक्रमात जाताना देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीने प्रवास केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
भुजबळांकडून फडणवीसांचे कौतुक
यानंतर झालेल्या सभेत छगन भुजबळ म्हणाले की, हरी नरके इथे मला घेऊन आले आणि सांगितले की या पडक्या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला आहे. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. सावित्रीबाईंना शेणाचे गोळे तुम्ही आणि सगळ्यांनी मारले, फक्त ब्राम्हणांनी नाही. फुलेंना काही ब्राम्हणांनी जसा विरोध केला तसा काहींनी मदतही केली. ज्या वाड्यात पहिली शाळा सुरु झाली ते भिडे ब्राम्हणच होते. देवेंद्रजी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात, म्हणून तुमचे धन्यवाद. विधीमंडळाच्या सभागृहाच्या समोर फुलेंची प्रतिमा लावण्याचे, महाज्योतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्याचे काम तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी केले. भिडे वाड्याचे काम सुरु झालंय. मात्र कामाला धक्का देण्याची गरज आहे. सावित्रीबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बंद आहे. तो पुन्हा सुरु व्हावा. वाकिफ कहाँ जमाना हमारी उडान से, वो और थे जो हार गए आसमान से, असे शेरोशायरी त्यांनी यावेळी केली.
फडणवीसांकडून शेरोशायरीतून भुजबळांचे कौतुक
भुजबळांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून शेरोशायरी करत त्यांचे कौतुक केले. "मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया", अशा प्रकारे तुम्ही काम सुरु केले त्यानंतर हळूहळू कारवाँ बनायला लागला आणि काम पुढे जायला लागले. आज एक चांगले स्वरूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पण मी तुमचे याकरिता अभिनंदन करेल की, या ठिकाणी प्रेरणास्थळ झाले पाहिजे हे तुम्ही ओळखले आणि त्याची सुरुवात तुम्ही केली. यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले.
आणखी वाचा