Girish Mahajan : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पराभवनंतर भाजपने (BJP) सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Teachers Constituency Election 2024) भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे महायुतीत (mahayuti) बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


चंद्रशेखर बावनकुळेंकडून गिरीश महाजनांची नियुक्ती


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपची ताकद लागणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीत आधीच मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी करावा लागणार सामना करवा लागणार आहे. आता मंत्री गिरीश महाजन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय करिष्मा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकच्या निवडणुकीत मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला


दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे. आता यात मंत्री गिरीश महाजन यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच महाविकास आघाडीचाही उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : महाजनांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांची लक्ष्मण हाकेंशी चर्चा, सह्याद्रीवर आजच बैठकीचं आयोजन


Girish Mahajan : 'एवढा उन्माद करू नका, मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही'; गिरीश महाजनांचा ठाकरे-राऊतांना इशारा