जालना : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणस्थळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम आहे.


सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका आहे. एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली. 


भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम - लक्ष्मण हाके


यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत नक्की भूमिका घ्या. आमच्या भवितव्याबाबत सामाजिक मागास घटकांत संभ्रम निर्माण झालाय. जरांगे आणि सरकार यांच्यापैकी कोण खरे बोलत आहे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना लक्ष्मण हाके यांनी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. 


नवनाथ वाघमारे काय म्हणाले? 


आम्हाला कोणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही. आमच्या हक्काच्या आरक्षणाचं बचाव होतो याचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे. 54 लाख नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू आहे, हे तात्काळ बंद झालं पाहिजे, 54 लाख नोंदी रद्द कराव्या, असं नवनाथ वाघमारे म्हणाले. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर ठाम आहोत. अधिकारी आठ आठ दिवसाच्या आत हे बोगस सर्टिफिकेट वाटत आहेत, या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली. सरकारला सगळी मुलं सारखी असतात मात्र आमच्याबाबत दुय्यम भूमिका घेतली जाते, सावत्र लेकासारखी वागणूक आम्हाला सरकारकडून मिळू नये, असेही ते म्हणाले.


शिष्टमंडळासमोर ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 


लक्ष्मण हाके यांनी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जाहीर करताच ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे लेखी हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी चर्चेसाठी यावे,अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.  यावेळी लक्ष्मण हाके यांनी घोषणा देऊ नका, सरकारला संधी देऊ, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange Patil: सरकारने आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हाला पाजतील; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा


''13 तारखेला फसवलं की तुमचा कार्यक्रम केलाच समजा''; जरांगेंचा इशारा, वडेट्टीवारांच्या अश्रूंवरही बोलले