बारामती : बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा विकास झालाय. हे बारामतीवर उपकार नाहीत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  2024 च्या निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी वचनबद्ध व्हावे असे आवानही केले.


बारामती (Baramati) दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी येथील मुक्ताई लॉनमध्ये भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचा (BJP Pune District Rural Division) संघटनात्मक आढावा त्यांनी घेतला. बारामती लोकसभा (Baramati Loksabha) क्षेत्राचे प्रभारी राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेशजी भेगडे, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भीमराव धापके, संदीप गिरे, कांचन कुल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला निवडणुकीचा नारळ


बारामती लोकसभा निवडणुकीचा नारळ कन्हेरी गावातील जागृत हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला. यानंतर त्यांनी काटेवाडी येथील बुथवर भेटी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केले. आहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भाजपा रैलीत सहभागी झाले. कसबा युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन, भाजपा कार्यालयास भेट दिली. मारेगाव येथे बुथ स्तरीय बैठक घेतली. या सर्व ठिकाणी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले. 


कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबतची शिवसेना नकली


कॉंग्रेस (Congress) व राष्ट्रवादीच्या (NCP) विचाराने चालणारी शिवसेना (Shivsena) खरी असूच शकत नाही. खरी शिवसेना हिंदुत्वाची जपवणूक करणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नेतृत्त्वातील आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा टोला त्यांनी लगावला. मागील अडीच वर्षांत ओबीसी आरक्षण मविआ सरकारला टिकविता आले नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच पुढाकार घ्यावा लागला, असेच मराठा आरक्षणही मिळवून देणार, असेही ते म्हणाले.


बारामतीला होणार मोदींची सभा


बारामती लोकसभा क्षेत्राची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना दिली आहे. त्याचा दौरा या महिन्यात होणार आहे. खुद्द पंतप्रधान मोदी बारामतीला येणार असून ते सभा घेणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. नागपूर एवढेच लक्ष बारामतीवर राहणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


BMC Elections 2022 : मुंबई महानगरपालिकेवर भाजपा-शिंदे सेनेचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा


Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 869 रुग्णांची नोंद तर सक्रिय रुग्णसंख्या सात हजारावर