BJP Meeting For Lok sabha Elections: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची आज मोठी बैठक होत आहे. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.


का होत आहे बैठक? 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत 144 लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी रणनीती तयार केली जाईल. ज्या भाजपने गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने गमावल्या होत्या. यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या किंवा कधीतरी जिंकलेल्या मतदारसंघांचाही समावेश आहे. या जागा गटांमध्ये विभागल्या गेल्या असून प्रत्येक गटाचे नेतृत्व एका केंद्रीय मंत्र्याच्या हाती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. मंत्र्यांनी या मतदारसंघातील भाजपच्या स्थितीचे विश्लेषण केले असून आणि 2024 च्या निवडणुकीत पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी याबाबत रणनीती बनवली आहे. आजच्या बैठकीत मंत्री या मतदारसंघांचा सविस्तर अहवाल सादर करतील.


या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित 


भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटन महासचिव बीएल संतोष, सुनील बन्सल, भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, सुभाष सरकार, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी एल मुर्गन, पंकज चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय मंत्री संजीव बल्यान, केंद्रीय मंत्री बीएल वर्मा अर्जुन मुंडा आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह उपस्थित होते.


विरोधी पक्षी लागले कामाला


दरम्यान, भाजपच्या आधीच विरोधी पक्षाचे नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात भाजपविरोधात विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आघाडी घेतली आहे. ते ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांची सातत्याने भेट घेत आहेत. अलीकडेच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यानंतर आता नितीश कुमार हे देखील या मोहिमेत खूप सक्रिय झाल्याचे दिसत आहे. नितीश कुमार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे. सोमवारी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. तर आज त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. विरोधी पक्षांकडून 2024 मध्ये ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला त्यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसेल, असं नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाने जाहीर केलं आहे. अशातच भाजप विरोधात 2024 मध्ये विरोधी पक्ष एकत्रित येऊन तिसरी आघाडी निर्माण करणार का? काँग्रेस देखील यात सामील होणार का? हे आणि यासंदर्भातील अशा अनेक प्रश्नाची उत्तरे नजीकच्या काळात मिळू शकते.