Chandrapur Lok Sabha Election : सध्याघडीला देशासह राज्यात निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहत आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारचे आश्वासन आणि आमिष दाखवत मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात. असाच एक अफलातून प्रयत्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Election 2024) उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी केला आहे. यात त्यांनी चक्क आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन मतदारांना दिलंय. 


आनंदाच्या शिध्यात देणार महागडी व्हिस्की अन् बिअर


फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की-बिअर का प्यावी? असं म्हणत देशी पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं अफलातून आश्वासन त्यांनी मतदारांना दिलंय. विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी गाव तिथे दारूचं दुकान या सारखे भन्नाट आश्वासन दिले होते. त्यावेळी देखील वनिता राऊत या त्यांच्या आश्वासनांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यंदा देखील त्यांनी मतदारांना अनोख्या पद्धतीने साद घातली असल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.  


अफलातून आश्वासनामुळे मतदारसंघ चर्चेचा विषय


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत चांगलीच चुरशीची ठरताना दिसत आहे. अशातच याच मतदारसंघातून उभ्या राहिलेले अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांच्या आश्वासनाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे.


श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनी देखील महागडी व्हिस्की-बिअर मिळायला हवी. या हेतून त्यांना आनंदाच्या शिध्यात अतिशय अल्प दरात व्हिस्की-बिअर देण्याचे आश्वासन वनिता राऊतांनी मतदारांना दिलंय. त्यामुळे त्यांच्या या आश्वासनाला चंद्रपुर मतदारसंघातील मतदार कितपत साथ देतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. 


गाव तिथे दारूचं दुकानाची केली होती मागणी 


अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी 2019 मध्ये देखील चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी गाव तिथे दारूचं दुकान असे भन्नाट आश्वासन दिले होते. चंद्रपुर लगतच्या इतर जिल्ह्यात, नागपूर मध्ये दारू बंदी नाही. मग चंद्रपुरकरांनी नेमके काय वाईट केले आहे की ज्यांना दारूबंदी सारखे निर्बंध घालण्यात येत आहे. चंद्रपुरमध्ये जर दारूबंदी उठवल्या गेली तर अनेकांना रोजगार मिळेल. असा अजब दावा त्यांनी त्यावेळी केला होता. मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता वनिता राऊतांच्या या आश्वासनाला कितपत यश येईल हा येणार काळच ठरवणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या