Amravati news अमरावती : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चष्मा लागल्याचा व्हिडीओ शेअर करताना, त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला. त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.
"पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते. कधी गंभीर झाल्या की बातमी होते. त्यामुळे त्यांचं दुर्दैव की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या? (Pankaja Munde Video)
आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडेंनी गाणं गात सांगितलं होतं. आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आमच्या पप्पांनी गणपती आणला, या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला, असं म्हटलं होतं. लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे, जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता स्पष्ट दिसायला लागेल. छोटा नंबर आहे. दूरचं आधीही चांगलं दिसत होतं, आताही चांगलं दिसतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले? (Chandrakant Patil on Pankaja Munde)
चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते. मीडियातून चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्यांचं नुकसान होतं."
संजय राऊतांना सीरियस घेत नाहीत (Chandrakant Patil on Sanjay Raut)
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. "संजय राऊत यांना त्यांच्या पक्षात कोणीही सीरियस घेत नाही. राज्यातही कोणी सीरियस घेत नाही. केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने बोलण्याचं धाडस ते करतात", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळेल
जायकवाडी धरणातील पाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी कालच सांगितले की मराठवाड्याला त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल.
मागासवर्ग आयोग हे स्वायत्त आहे. मुख्यमंत्रीही त्यांना सूचना देऊ शकत नाही.घटनेअंतर्गत तरदूत असलेला तो आयोग आहे.त्यामुळे त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.