Rajasthan Assembly Elections 2023: राजस्थानच्या निवडणुकीचा (Rajsthan Assembly Ekection) प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वतः उपस्थित राहत आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजस्थानची वाट धरली आहे. अशातच राजस्थानमधील एक बॅनर राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेत आहे. राजस्थानमधील बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे 'हिंदूहृदयसम्राट' असं लिहिण्यात आलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. 


राजस्थानमधील एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'हिंदूहृदयसम्राट' असा करण्यात आला आहे. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिंदे गटावर सडकून टिका केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. पक्ष, नाव चोरलं आता बाप चोरायचा प्रयत्न, किती तो निर्लज्जपणा, असं म्हणत ठाकरे गटाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. 


ठाकरे गटानं नेमकं म्हटलंय काय ट्वीटमध्ये? 


ठाकरे गटानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला... आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात 'हिंदुहृदयसम्राट' फक्त एकच... वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!"


दरम्यान, 'हिंदूहृदयसम्राट' ही शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलीली उपाधी. अशातच शिंदेंसह आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या ताब्यात असलेल्या एकएका गोष्टीवर दावा करण्यात आला. त्यामध्ये अगदी पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाचाही समावेश आहेच. अशातच आता थेट बाळासाहेब ठाकरेंना दिलेली उपाधी राजस्थानातील बॅनरवर शिंदेंच्या नावापुढे झळकल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. 


राजस्थानात 'लाल डायरी' झळकावणारे राजेंद्र गुढांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी 


मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या कथित भ्रष्टाचाराची लाल डायरी विधानसभेत दाखवणारे आमदार अशी गुढांची ओळख. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. तर मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी हे मतदानाकरता राजस्थानला जातात, या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या राजकिय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर आता राजस्थानला जात असल्याने शिवसेनेचा आता महाराष्ट्राबाहेरही राजकीय विस्तार करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे.