मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या भूमिकेकडे राज्यातील कोट्यवधी मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता चौथा टप्प्यात सोमवारी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात बीड (Beed) आणि जालना लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जालना व बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वीच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसेच, मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांच्यावरही तिखट शब्दात प्रहार केला. 


8 जून रोजी नारायण गड येथे भव्य सभा घेतोय, 15 मे रोजी येथील जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातील सर्वच मराठा बांधवांना येथील सभेसाठी आवाहन करण्यात येत असून 6 कोटी मराठा बांधव याठिकाणी येणार आहेत, असे जरांगे यांनी म्हटले. 15 तारखेच्या पाहणीनंतर सभेबाबतचा अंतिम निर्णय मी घेणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल


चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं? त्यांना काय कळतं. फक्त तेरे नाम भांग पाडून फिरत असतात, स्वतःची 37 मतं तरी त्यांना पडतात का?, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी चंद्रकां पाटील यांची खिल्ली उडवली. 


पंकजा मुंडेच जातीयवादी राजकारण करत आहेत


पंकजा मुंडे यांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही. उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत. भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचे होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतला नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी बीडमधील राजकीय वातावरणावर भाष्य केलं. 


प्रमाणपत्र न देण्याचे आदेश फडणवीसांना दिले


एबीपी माझाला मी शब्द देतो, देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावं एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला, मी त्याचं नाव लगेच घेणं बंद करतो. माझा एकच सवाल आहे, आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले? एसआयटी आमच्यावर का नेमली उत्तर द्या?, असे सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश होऊन देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र देऊ नका असे आदेश दिले आहेत, तुम्ही असं का करताय? भाजपच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो, अन्यथा 106 आमदार यांचे निवडून आले नसते, असे म्हणत जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे.