Chandrakant Khaire: विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात राजकीय घटनांना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी हाक देत माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) कार्यकर्त्यांसमोर भर व्यासपीठावरच नतमस्तक झाल्याचे पहायला मिळाले. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं म्हणत हात जोडून कार्यकर्त्यांसमोर चंद्रकांत खैरे नतमस्तक झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरे म्हणाले,मी हात जोडून विनंती करतो. तुम्हाला इथं दंडवत घालतो, उद्धव ठाकरेंकडे आपल्याला पहायचंय. परवाच्या कार्यक्रमात ते किती कळकळून बोलले. मी तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझं काही चुकलं तर मला बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती अशी आहे थांबा.. असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत घातलं. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणूका, जिल्हा परिषद निवडणूका निवडून येऊ असे खैरे म्हणाले.
संजय राऊतांनी काय घोषणा केली?
शिवसेना ठाकरे गट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. कारण मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. असा सल्लाही खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया देत टीका केली आहे.
हेही वाचा: