Manikrao Kokate vs Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून (Maharashtra Cabinet) डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर त्यांनी टीकास्र सोडले होते. त्यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे. कोकाटे यांनी भुजबळांना थेट लक्ष्य केल्यामुळे पक्षात वादही निर्माण झाले होते. परंतु, शनिवारी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. पक्षाकडून मला भुजबळांबाबत भाष्य करू नये, असा संदेश असल्याने माझ्याकडून भुजबळांचा विषय संपल्याचे सांगत, भुजबळांसोबत सुरू असलेल्या वादात त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. पण, कलगीतुरा नको. भुजबळांबाबत भाष्य करू नये, असा पक्षाकडून मला आदेश आला आहे. त्यांच्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, अशी त्यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केली आहे. त्यामुळे छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
कोकाटे-भुजबळांमध्ये कलगीतुरा
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये झळकलेल्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो गायब झाला होता. तर भुजबळांचे कट्टर विरोधक नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर झळकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तर जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कुणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली होती.
तसेच राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात, अशी टीका काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कोकाटेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. माणिकराव कोकाटे उपरे आहेत. 5 वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत नव्हते. शरद पवारांना मी बोललो ते घ्यायला तयार नव्हते. परंतू, मी आग्रह केला म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतल्याचे प्रत्युत्तर भुजबळांनी दिले होते. यानंतर पक्षाकडून मला भुजबळांबाबत भाष्य करू नये, असा संदेश असल्याने माझ्याकडून भुजबळांचा विषय संपल्याचे सांगत माणिकराव कोकाटे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...'