NCSC Card: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले होते. आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे. या दोन्ही गोष्टी अभिमान वाटव्यात अशा आहेत.'' ते म्हणाले, ''आपण मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतून आपला प्रवास झाला आहे. शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी बसमधून प्रवास झाला आहे. मात्र आता काळ बदलला असून आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत. आयुष्याच्या प्रवासात कितीही थांबे आले तरी पुढे चालत राहायचं.''
बेस्ट कर्मचाऱ्यांचे केले कौतुक
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनात 2 वर्ष गेली, मग माझी शस्त्रक्रिया झाली. यानंतर अनेक कामाचं लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आलं. मात्र आज आपण बेस्टचं कौतुक करायला आलो आहोत. मुख्यमंत्री अनेक झाले होतील, मात्र बिरुद कोणतं लागत ते महत्वाचे आहे. कोरोना काळात बेस्टचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबई बस स्टॉपचं मॉडेल केंद्र सरकारने मागितले आहे, असं ते म्हणाले.
आमचं गदाधारी हिंदुत्व आहे, विरोधकांवर साधला निशाणा
यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मलमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही..''