Bhaskar Jadhav Banner : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात मुंबईमध्ये (Mumbai) बॅनर लावण्यात आले आहेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत.  भास्कर जाधव यांना शोधून देणाऱ्याला 11 रुपये बक्षिस देण्यात येईल, असा मजकूर या बॅनरवर आहे. भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 


बॅनरवरील मजकूर काय?
मुंबईतल भाजपने लावलेल्या बॅनरवर भास्कर जाधव यांच्या फोटो आहे. "आपण यांना पाहिलंत का? शोधून आणणाऱ्याला रोख रु. 11/- बक्षिस", असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.


भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर जहरी टीका
ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे 18 ऑक्टोबर रोजी नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. सोबतच यावेळी जाधव यांनी राणेंची नक्कल देखील केली होती. "नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. 39 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, तर 39 वर्ष काम करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?" असं भास्कर जाधव म्हणाले होते.


जाधव यांच्याविरोधात नवी मुंबई, पुणे आणि कुडाळमध्ये गुन्हा दाखल 
नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टीका-टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबई, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्थानकात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल व्हावा," अशी तक्रार कुडाळ पोलीस स्थानकात भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. 


संबंधित बातमी