MCA Election : एमसीएच्या बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट झाली. एरवी राजकीय हेव्यादाव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी राजकीय मंडळी काल एमसीएच्या (MCA Elections) छताखाली एकीने वावरताना पाहायला मिळाली. त्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो. दुसरीकडे बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) एकाच गाडीनं रवाना झाल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार-फडणवीसांमध्ये भेट, कमालीची उत्सुकता
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज होणार असून एमसीएच्या निवडणुकीतली रंगत वाढली आहे. या निमित्ताने काल महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी एकाच मंचावर आलेले दिसले. या जाहीर कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परस्परांशी गरवारे क्लबमध्ये चर्चा केल्याचे समजते. ही चर्चा नेमकी कशाबद्दल झाली? याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
या भेटीनंतर अजित पवार काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांच्यासा झालेल्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, बरेच दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो नव्हतो, दिवाळीला मी जाणार होतो, त्यांनी मला सह्याद्री अतिथिगृहावर भेटायची वेळ दिली, नंतर ते म्हणाले की, एमसीएच्या कार्यक्रमाला मी आहे तर तुम्ही इथेच यावे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किट वाटायला थोडासा उशीर झाला. दिवाळी झाल्यावर कीट वाटून उपयोग काय वेळेला महत्त्व आहे. उद्यापासून महाराष्ट्रात किट मिळायला लागेल
शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर एकाच गाडीनं रवाना
तर दुसरीकडे एमसीए निवडणुकीतले उमेदवार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शरद पवार यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत गेले. मग शरद पवारांनी त्यांना गाडीत बसवले. प्रवासादरम्यान या दोघांची काय चर्चा झाली? याबद्दल प्रचंड कुतुहल आहे. दरम्यान, ही चर्चा तब्बल 20 मिनिटे झाली असल्याची माहिती आहे. तर शरद पवारांनी नार्वेकरांना निवडणुक जिंकण्यासाठी कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यावेळी सिल्व्हर ओक मध्ये गेले नसल्याची माहिती आहे.
यामध्ये कुठलाही राजकीय संबंध नव्हता - अमोल काळे
बहुचर्चीत MCA अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे म्हणाले, कुठली निवडणूक म्हटली की महत्त्वाची असते. इथे जरी साडेतीनशे मतदार असले तरी ही निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची आहे. सगळे राजकीय नेते एकत्रित होते कारण त्यांचे क्रिकेटवर प्रेम आहे. बऱ्याच वर्षापासून शरद पवार आशिष शेलार जितेंद्र आव्हाड हे सगळे क्रिकेटचे प्रेमी आहेत. यामध्ये कुठलाही राजकीय संबंध नव्हता. निवडणूक कधीच सोपी नसते, यामध्ये शेवटपर्यंत चुरस असते. मतदारांशी भेटतोय त्यांच्याशी संपर्क करतोय. सर्वच आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. संदीप पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही म्हणत आहात पाटलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे तगडी जेवढी टीम तेवढी खेळायला माझ्या जास्त आहे
आज एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association Election) अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार
MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी (MCA President Election) नामांकन अर्ज भरला आहे. त्यानंतर शेलारांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी देखील अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरलाय. तर क्रिकेटच्या राजकारणात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील उडी घेतली आहे. MCA निवडणुकीतील 106 मतदारांशी शिंदेंची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. शेलार आणि शरद पवारांचं संयुक्त पॅनल MCA निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. त्याला शिंदे गटाचा देखील पाठिंबा मिळाला आहे.
संबंधित बातमी