Dhule Political News : धुळे जिल्ह्याच्या राजकारणाला हादरवणारी बातमी आहे, भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते, धुळ्याचे माजी आमदार तसेच धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांना जोरदार राजकीय हादरा बसला असून त्यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेना (Shivsena) पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्रीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत यशवर्धन कदमबांडे यांनी शिवबंधन बांधले आहे.


अचानक मुलाने शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ 
धुळ्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे कायमच राजवर्धन कदमबांडे यांच्या भोवती राहिले असून गेल्या अनेक वर्षांपासून कदमबांडे यांचे राजकीय वर्तुळात वर्चस्व राहिले आहे. दोन वेळा धुळे शहराचे आमदार राहिलेल्या राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांचे चिरंजीव यशवर्धन कदमबांडे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते, मात्र अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून राजवर्धन कदमबांडे यांच्या घराण्याची ओळख आहे, त्यांच्या सुपुत्राच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे कोणती राजकीय समीकरणे बदलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे


कोण आहेत यशवर्धन कदमबांडे?


धुळे शहराचे माजी आमदार तसेच छत्रपती शाहू महाराज घराण्याचे वंशज म्हणून ओळख असलेल्या राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र आहेत, वडिलांबरोबर ते देखील स्वतः सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असून त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरत भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. ते भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे एक सक्षम पदाधिकारी म्हणून कार्य करीत होते. राजकारणात त्यांनी आपला एक धबधबा निर्माण केला होता तसेच भाजपा युवकांचा मोठा गोतावळा देखील त्यांनी निर्माण केला होता


धुळ्यातील राजघराण्यात फूट पडल्याची चर्चा 
यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून धुळ्यातील राज घराण्यात फूट पडल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रवेशामागे नेमकी कोणती राजकीय गणिते आहेत? याचे देखील तर्कवितर्क लावले जात आहे