चंद्रपूर : भाजपला राज्यात मोठा विजय मिळाला असला तरी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा (Sudhir mungantiwar) बालेकिल्ला समजला जाणाऱ्या चंद्रपुरात 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर भाजपला (BJP) अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं. त्यामुळे, सुधीर मुनगंटीवारांची मनातील खदखद बाहेर पडली अशी चर्चा सुरू आहे. त्यावर, भाजप नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवारांनी आपलं परखड मत मांडलं आहे. मुख्यमंत्रीपद हे परमंट नाही, तेही येणार आणि जाणार असं त्यांनी म्हटलं.
विदर्भातील 100 नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी तब्बल 55 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 27 पैकी 22 नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवला आहे. मात्र, चंद्रपूरमध्ये भाजपला केवळ दोनच ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यानंतर मुनगंटीवारांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यावर, भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. चंद्रपुरात जे घडलं त्याची नक्कीच आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधील पराभवाचा संबंध मंत्रीपदाशी जोडत असले, आणि त्यांची भावना योग्य असली, तरी मंत्रिपद नसणे आणि पराभव होणे असा थेट संबंध नाही. चंद्रपूरबद्दल नक्कीच आत्मविश्लेषण करू, वेळ आली तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतही बोलू, असे बावनकुळेंनी म्हटलं होतं. आता, त्यावर पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी आपलं मत मांडलं आहे.
मी नाराज नाही पण योग्यवेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आहे. कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी निश्चित माझी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे वठवतो. पक्षाने मला जेव्हा जेव्हा शक्ती दिली तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढावी यासाठी काम केलं. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज कशाला असेल, नाराजी जनतेत असेल. मंत्रिपद येतं आणि जातं, मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे त्यांचंही येणार आहे जाणार आहे, परमनंट कोणीच नाही, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपलं परखड मत मांडलं. तसेच, उत्तमोत्तम काम करायचं हेच फक्त आमचं काम आहे, असेही त्यांनी म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर परखड मत
बावनकुळे साहेबांना असं वाटणं योग्य आहे. मध्यंतरी त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते तेव्हा त्यांनाही वाटत होतं, अशी आठवणच सुधीर मुनंगटीवार यांनी करुन दिली.
शोभाताईंची भेट कौटुंबिक
शोभाताई काही आता भाजपच्या पदाधिकारी नाहीत, त्यांच्याकडे कुठली जबाबदारी नव्हती, त्यांनी कुठली सभा घेतली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात त्या गेल्या असतील असं मला वाटत नाही. त्या मुख्यमंत्र्यांच्या काकू आहेत, कुटुंबाचे प्रश्न म्हणून गेल्या असतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी त्यांना भेटावं, त्यांचं मत जाणून घ्यावं, त्यामुळे भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून ही माझी जबाबदारी आहे. आम्हीही या पक्षाच्या विस्तारात आपलं आयुष्य दिलं आहे, कार्यकर्त्यांचा सूर काय आहे हे भेटल्यावरच कळेल, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं परखड मत पुन्हा एकदा मांडलं.
हेही वाचा
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव