Sinnar Election Result: सिन्नर नगरपालिका निवडणुकीत (Sinnar Election Result) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Ajit Pawar Faction) बाजी मारत नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उगले यांनी विजय मिळवला असून, त्यांच्या प्रचारात पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आघाडी घेतली होती.
गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे राजकीय अडचणीत सापडले आहे. मंत्रिपद गमावल्याने आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्षाची नामुष्की झाल्याच्या आरोपांमुळे ते बॅकफूटवर गेले असल्याचं चित्र होतं. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवरही कोकाटेंनी सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वाचं यश मिळवून दिलं आहे.
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची प्रतिष्ठा लागली होती पणाला
सिन्नर नगरपालिकेत यंदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली. ही निवडणूक शिवसेना उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनीही स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले होते.
Rajabhau Waje: राजाभाऊ वाजे यांना मोठा राजकीय धक्का
भाजपने ठाकरे गटाचे नेते हेमंत वाजे यांना पक्षात प्रवेश देत थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. तसेच, सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवून मोठी मतसंख्या मिळवलेले उदय सांगळे यांनाही भाजपमध्ये घेत प्रचारात उतरवण्यात आलं. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही भाजपचे उमेदवार हेमंत वाजे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपसोबतच शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नामदेव लोंढे आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रमोज चोथवे यांचाही पराभव झाला. विशेषतः चोथवे यांच्या पराभवाकडे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का म्हणून पाहिलं जात आहे.
Manikrao Kokate: कोकाटेंनी सर्व डाव हाणून पाडले
कोकाटेंच्या पराभवासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली होती. फोडाफोडीचं राजकारण करत अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे सर्व डावपेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी यशस्वीपणे हाणून पाडले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करून कोकाटेंनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. प्रचारादरम्यान घेतलेल्या सभांमध्ये कोकाटेंनी भाजपवर जोरदार टीका केली होती. “भाजप हा बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडीवरच भाजपचं राजकारण उभं आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. एकीकडे मंत्रिपद गेल्याने अडचणीत सापडलेले माणिकराव कोकाटे, तर दुसरीकडे सिन्नरमध्ये मिळवलेलं हे यश, यामुळे कोकाटेंच्या राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा