ठाणे : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा (Election) निकाल जाहीर झाला असून दुसरीकडे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीच्या पक्षांनी घवघवीत यश मिळवले आहे. भाजपने तब्बल 120 पेक्षा अधिक जागांवर नगराध्यक्ष निवडून आणत सत्ता काबिज केली, तर शिंदेंच्या शिवसेनेनंही 60 हून अधिक जागांवर आपला भगवा फडकवला आहे. आता, महापालिका निवडणुकांसाठी मुलाखती आणि पक्षाची रणनिती आखायला सुरू आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या मुलाखतीवेळी मारहाणीची घटना घडली. या मारहाणीच्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांची मुलाखत सुरू असताना आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली असून ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेत दोघेही जखमी झाले असून दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दोघांनाही रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेनंतर कल्याणमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला असून कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्ते जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

वरिष्ठांची मध्यस्थी, वादावर पडदा पडला

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुलाखती दरम्यान झालेल्या वादावर पडदा पडला आहे.  वरिष्ठांच्या मध्यस्थीने अखेर वादावर पडदा पडला असून पोलिसांनी निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यानंतर, दोघांचे आपसातले वाद मिटले असल्याचे त्यांनी सांगितले.  

Continues below advertisement

हेही वाचा

पक्षाच्या, नेत्याच्या अन् कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता ती वेळी आली; नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंचं सूचक विधान