मुंबई: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी शेवटचे काही तास उरले असताना आता भाजपकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. 'आधार लाडक्या बहिणीला आशीर्वाद महायुतीला' अशा मथळ्याखाली राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, भाजपने (BJP) दिलेल्या या जाहिरातीमधून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) हा शब्द गायब असल्याने पुन्हा एकदा महायुतीमधील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा रंगताना दिसत आहे.  


या जाहिरातीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' ऐवजी केवळ 'लाडकी बहीण योजना' असा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ 'लाडकी बहीण योजना' असा उल्लेख केला जात होता. यावर शंभुराजे देसाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. शंभुराजे देसाई यांच्या नाराजीनंतर जाहिरात देताना तिन्ही पक्षासाठी काय नियम पाळले जावेत याबाबत नियमावली करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, आता भाजपनेच मुख्यमंत्र्यांना वगळून लाडकी बहीण योजनेची जाहिरात केल्याने महायुतील नव्या वादाला तोंड फुटणार का, हे पाहावे लागेल. यावर आता शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी साताऱ्यातील त्यांच्या गावी जाणार आहेत. त्यामुळे दिवसभरात शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात,याकडे सर्वांच्या नजरा असतील.


भाजपच्या जाहिरातीमध्ये नेमकं काय?


भाजपकडून प्रमुख दैनिकांच्या फ्रंट पेजवर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महिला राखी बांधतानाचा फोटो आहे. जाहिरातीच्या मथळ्यात आशीर्वाद महायुतीला असा उल्लेख असला तरी कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो दिसत नाही. महायुतीशासित महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी, चार हफ्ते जमा, असा मजकूर ठळक अक्षरात लिहण्यात आला आहे. याशिवाय, जाहिरातीमध्ये संक्षिप्त शब्दांत इंडिया आघाड्या इतर राज्यांतील योजनांच्या अपयशाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तेलंगणा, हिमालच प्रदेश, कर्नाटक आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीने योजनांच्या नावाखाली नागरिकांची कशाप्रकारे फसवणूक केली, हे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.


अजित पवारांनाही 'मुख्यमंत्र्यांना' वगळले होते


काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाकडून  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची जाहिरात करण्यात आली होती. तेव्हादेखील या जाहिरातीमधून मुख्यमंत्री हा शब्द जाणीवपूर्व वगळल्याची चर्चा रंगली होती. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजना सुरु केली, असे ठसवण्याचा प्रयत्न या जाहिरातीमधून झाला होता. 'माझी लाडकी बहीण योजना - महिन्याला दीड हजार रुपये, दादाचा वादा लाभ आणि बळ' असा उल्लेख करत जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता.


आणखी वाचा


मुख्यमंत्र्यांची नव्हे तर अजितदादांची लाडकी बहीण योजना; राष्ट्रवादीचं जोरदार मार्केटिंग, कुरघोडीच्या राजकारणामुळे महायुतीत वाद पेटणार?