मुंबई: भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. यानंतर देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी विधानपरिषदेत विश्वचषक (T 20 World Cup) जिंकल्याबद्दल भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, यावेळी टीम इंडियातील (Team India) 11 खेळाडुंचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) कोषाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या मुद्द्यावरुन उपसभापती निलम गोऱ्हे सभागृहात बोलून देत नसल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विरोधकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले की, विधानपरिषदेच्या उपसभापती विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलून देत नाहीत. सत्ताधारी लोक काहीही बोलतात आणि त्यांना परवानगी दिली जाते. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. त्यासाठी सभागृहात भारतीय संघातील 11 खेळाडुंचे अभिनंदन करायला पाहिजे होते. पण भाजपचे नेते म्हणतात बीसीसीआयचे कोषाध्यक्ष शेलार यांचे अभिनंदन करा. खरंतर विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडुंचं अभिनंदन केले पाहिजे, संघाचे अभिनंदन केले पाहिजे. कारण, ते मेहनत करतात, परिश्रम घेतात. रक्ताचं पाणी करुन देशाचं नाव उंचावतात. ते सोडून बीसीसीआयमध्ये असणाऱ्या भाजपच्या लोकांचं अभिनंदन केलं जातं. हा भारतीय खेळाडुंचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.
भाजपला देशाशी काही देणंघेणं नाही. त्यांना स्वत:चे नेते, स्वत:चा पक्ष आणि स्वत:ला ओवाळून घेण्यातच रस आहे. हा तूप लावून चमचेगिरी करण्याचा प्रकार आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. यावर आता विरोधक काय बोलतात, हे पाहावे लागेल.
भारतीय संघाने विश्वचषक जिंकून 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. भारताचे आफ्रिकेसमोर विजयसाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांमध्ये कमाल केल्याने टीम इंडियाने 7 धावांनी थरारक विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या या विजयामुळे देशभरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयनेही भारतीय खेळाडुंवर बक्षिसांची खैरात केली आहे.
आणखी वाचा