धाराशिव : भारतीय क्रिकेट संघाने टी-20 चा विश्वकप जिंकल्यानंतर अवघ्या देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर देखील या घटनेचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना 201 किलो पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे. भारताने तब्बल 17 वर्षानंतर विश्वचषक जिंकल्यामुळे खुशीला पारावर उरलेला नाही. तुळजापूरचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.


तब्बल 17 वर्षांनंतर ट्रॉफी भारताकडे


भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केलं. (India Win T20 World Cup 2024)


भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस


रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवलं आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखलं. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले.


दक्षिण आफ्रिकेनेही कमावले 10 कोटी


भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळालं आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आलं  होतं. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने  1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले. 


उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही मोठं बक्षीस


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.54 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळालं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 ला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.


हेही वाचा:


Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी सोमवारी करा 'हे' उपाय