Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून निकाल कोणाच्या बाजूने येणार याची सर्वच उमेदवारांना उत्कंठा लागून राहिली आहे. महायुतीने (Mahayuti) दोन उमेदवार दिल्यामुळे महायुतीत सुसूत्रता नव्हती आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणाचा मला फायदा होईल. निवडणुकीत केलेले आरोप, बोगस मतदान, मला इतर पक्षातील नेत्यांकडून मिळालेला छुपा पाठिंबा यावर 100 टक्के पहिल्या पसंतीत माझा विजय होईल, असा दावा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. 


ऐतिहासिक निकाल येणार : विवेक कोल्हे


मतमोजणी केंद्रावर एबीपी माझाने विवेक कोल्हे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ऐतिहासिक निकाल येणार, याची पूर्ण खात्री आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सुसूत्रता नव्हती.  महाविकास आघाडी आणि महायुतीचा नाराजीचा मला फायदा होणार आहे. निवडणूक लढवताना निवडणुकीची पात्रता खालवण्यात आली. बोगस शिक्षक मतदान नोंदणी करण्यात आली त्या विरोधात भूमिका घेणार आहोत. 


मला मिळालेल्या छुप्या पाठिंबावर विजयाची खात्री : विवेक कोल्हे


सत्य विरुद्ध सत्ता, अपमान विरुद्ध स्वाभिमान, अशी ही लढत होती. बोगस मतदानावर आम्ही पुढील काळात कायदेशीर कारवाई करणार आहोत. शिक्षकांना पैसे वाटप करत प्रलोभन करण्यात आले, शाळेत जाऊन शिक्षकांना पैसे वाटले, असा आरोप त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर केला. तसेच आश्चर्यजनक निकाल लागेल, असा विश्वास आहे. मला मिळालेल्या छुप्या पाठिंबावर विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचेही विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?