Pm Narendra Modi : सोमवारी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने मिशन 2024 ची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीत दोन दिवसीय उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सोमवारी होणाऱ्या या बैठकीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या बैठकीत भाजपचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. त्यानंतर लगेचच ते भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीला रवाना होतील. सभेचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये आगामी निवडणुकांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सहभागी होऊ शकतात. यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा करणार आहेत.
या बैठकीत ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्या राज्यांच्या निवडणूक अहवालांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे प्रभारी विधानसभा निवडणुकीबाबत आपला अहवाल सादर करतील. दिल्लीचे प्रभारी महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित अहवालही देतील, ज्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी ज्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचे प्रभारी आपापल्या राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीचा अहवालही बैठकीत मांडतील, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यन, पुढील वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासोबतच दिल्ली एमसीडी निवडणुकीसाठी रविवारी मतदान पूर्ण झाले आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. यातच सोमवारी मतदान करण्यासाठी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले आहेत. आई हीराबेन यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी गांधीनगर येथील घरी गेले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: