Pravin Darekar on Lok Sabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेय.एनडीए की इंडिया, देशात  कुणाची सत्ता येणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. आशातच राज्यातील भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याशिवाय महाराष्टात महायुतीला किती जागा मिळतील, याबाबतची अंदाज वर्तवलाय. गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशसारख्या मोठ्या सात ते आठ राज्यात एनडीएला चांगलं यश मिळेल, असं प्रविण दरेकर यांनी सांगितलेय. 


महाराष्ट्रात किती जागा मिळतील?


उत्तर प्रदेश सर्वाधिक मोठे राज्य आहे. जिथे आम्हाला प्रचंड यश मिळेल. बिहारला चांगले यश मिळेल. उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. तिथेही आम्हाला 40 च्या आसपास जागा मिळतील. गुजरातला 26 च्या 26 जागा मिळतील. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही शंभर टक्के यश मिळेल. जी मोठी सात-आठ राज्ये आहेत तिथे भाजपा किंवा महायुतीला 80 टक्के यश मिळतील, असा विश्वास प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. त्याशइवाय एनडीएचा सत्तेचा मार्ग निर्विघ्नपणे मोकळा होईल, असेही दरेकर म्हणाले. 


400 जागा शंभर टक्के मिळणार - 


भाजपला 400 च्या आसपास जागा 100 टक्के मिळणार. प्रीप्लॅन करण्याची आवश्यकता नाही. जर मॅजोरीटीच आम्हाला मिळणार असेल असा स्पष्ट कौल असेल तर प्रीप्लॅनची आवश्यकता नाही. निर्विवाद सत्य आहे, देशात चित्र दिसतेय ते भाजपा आणि महायुतीला प्रचंड जनाधार लोकसभेत मिळेल, असे प्रविण दरेकर म्हणाले. 


आनंदराव अडसूळांवर नाराजी-


महायुतीत एकत्र राहून आपल्या युतीसंदर्भात विरोधात बोलणे ही विकृती आहे. शिवसेना पक्ष भाजपासोबत आहे. उमेदवारीवेळी आपण समर्थन दिलेत. आता निवडणुका झाल्यावर ते पडणार, अशा प्रकारचे बोलणे महाराष्ट्रात आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. हे विकृत प्रकारचे वक्तव्य आहे. ज्या पक्षात, महायुतीत आहोत त्याच पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्या पडणार अशा प्रकारचा आत्मविश्वास देणे ही आपली राजकीय संस्कृती नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.


मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मेहनत - 


भाजपा किंवा महायुतीने निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रचंड मेहनत, परिश्रम घेतले. मतं कुणालाही द्या, परंतु मतदान मोठ्या प्रमाणावर करा ही आमची पक्षाची, महायुतीची भुमिका होती. दुर्दैवाने या निवडणुकीत लागून सुट्ट्या आल्या, उष्मा मोठ्या प्रमाणावर आहे. गर्मी असल्याने लोकं बाहेर पडली नाहीत. याचा एकंदर परिणाम तेथील निवडणुकीच्या टक्केवारीवर झाला याला काही मंत्री किंवा कोणीही जबाबदार नाही. लोकांनी निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे, लोकशाहीत फार मोठा आपल्याला दिलेला अधिकार आहे तो बजावला पाहिजे. सर्वस्वी मतदारांनी मतदान वाढविण्यावर भर दिला पाहिजे तरच मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यश मिळेल. केवळ नेते, मंत्र्यांची इच्छा असून चालणार नाही, असे दरेकर म्हणाले.


अंबादास दानवेंवर टीकास्त्र -


अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून प्रगल्भतेने बोलण्याची गरज आहे. ते अत्यंत बालिशपणाने, अभ्यास न करता प्रत्येक विषयावर भाष्य करताना दिसताहेत. विरोधी पक्षनेत्याचे विधान हे पूर्णपणे अभ्यासपूर्ण असायला पाहिजे. केवळ एका वर्तमान पत्राच्या बातमीच्या आधारे बोलत असाल तर ते आपले अज्ञान आहे. त्यांनी एक गोष्ट मान्य केली आमचे राज्यमंत्री भागवत कराड त्या विषयात आग्रही होते. शासन स्तरावर कुठल्याही प्रकारे बैठक मिनिटाईज झाली नव्हती. कुठल्याही प्रकारचे एमओयू त्या कंपनीसोबत झाला नव्हता. जी गोष्टच प्रक्रियेत नव्हती त्याविषयी एका वर्तमान पत्राचा आधार घेऊन बोलने हे निराधार, निकालास खोटं अशा प्रकारचे अंबादास दानवेंचे वक्तव्य आहे, असे दरेकर म्हणाले.