Nana Patole On Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट (Dombivli Blast) होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर आता राज्याचे राजकारण देखील तापले आहे. काल डोंबिवलीच्या कारखान्यात स्फोट झाला, त्यात अनेकांचे जीव गेले. तिथल्या धोकादायक परिस्थितीची माहिती सरकारकडे आली होती. तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने ते सर्व धोकादायक कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात खोक्याचे सरकार आल्यानंतर त्यांनी तिथल्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आणि उद्योग सुरू ठेवले. त्यातूनच कालची ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
....तर सरकारचे डोकेही तपासले पाहिजे
पुणे पोर्शे अपघात प्रकरण (Pune Porsche Car Accident Updates) संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. बड्या उद्योगपतीच्या मुलाने 2 निष्पाप जीव घेतल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळलीय. या प्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहे. अशातच या प्रकरणाने राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातला कायदा सुव्यवस्था संपली आहे. त्यामुळे फक्त पुणे पोलिसांची चौकशी नको, तर सरकारचे डोकेही तपासले पाहिजे.
सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादाची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणीही नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. या प्रकरणात सरकारचा दबाव होता का, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सरकारचे दबावामुळे भीती आहे का, या साऱ्यांची चौकशी झाली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
सरकार तुपाशी आणि जनता उपाशी- नाना पटोले
राज्यात दुष्काळाचे भयाण सावट आहे. अनेक गावात पाण्यासह चारा प्रश्न अधिक बिकट होत आहे. दुसरीकडे आचारसंहितेचे कारण सांगून सरकार दुष्काळ निवारणपासून पळवाट काढत आहे. जनता पाण्यासाठी पायपीट करत आहे. जनावरांना चारा नाही, तर अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. राज्यात सरकार तुपाशी आणि जनता उपाशी, अशी स्थिती आहे.
मुख्यमंत्री आढावा घ्यायला गेले आणि त्यांचे मंत्री त्यांना ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पाणीटंचाई आणि दुष्काळ संदर्भातील आढावा बैठकीत मंत्री उपस्थित न राहणे हे फार गंभीर आहे. परिणामी दुष्काळ निवारणाची कामे लवकर सुरू करावी, आचारसंहितेचे कारण सांगू नये. असे देखील नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या