नवी दिल्ली : येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत जो बाजी मारेल, तो सरकारची स्थापना करणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवसांत नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होईल. दरम्यान, निकालानंतर सत्ताधारी भाजप (BJP) पक्षातही मोठे बदल होणार आहेत. पक्षात राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यास महाराष्ट्रातही भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होणार


लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. आता 4 जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाईल. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. भाजप मोदी यांना पंतप्रधानपदी कायम ठेवणार आहे. भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 


भाजपमध्ये नेमका काय बदल होणार?


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल येत्या 6 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर नड्डा यांच्या जागी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. तसे झाल्यास महाराष्ट्र भाजपमध्येही अनेक फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?


दरम्यान, जे पी नड्डा यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम न ठेवल्या, त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे. सध्यातरी याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच नव्या अध्यक्षांच्या निवडीवर निर्णय घेतला जाऊ शकतो.    


महाराष्ट्रात काय स्थिती? 


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर एकूणच महाविकास आघाडीच्या काही जागा वाढतील असे सांगितले जात आहे.  


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महायुती


भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी


ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


--------------


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12