कोल्हापूर : कोल्हापूरमधील भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी 23 ऑगस्टला समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर घाटगे यांनी पक्ष सोडू नये यासाठी भाजपकडून देखील जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक समरजितसिंह घाटगे यांच्या घरी दाखल झाले आहेत. 


समरजितसिंह घाटगे यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे धनंजय महाडिक घाटगे यांच्या घरी पोहचले आहेत. घाटगे यांनी भाजप पक्ष सोडू नये ही विनंती करण्यासाठी धनंजय महाडिक पोहोचले असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी  काही दिवसांपूर्वी कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ महायुतीचे उमेदवार असतील, असं जाहीर केलं होतं. समरजितसिंह घाटगे हे भाजपमध्ये असून ते या जागेवरुन विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  विधानसभा निवडणुकीसाठी समरजीत सिंह घाटगे तुतारी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपकडून त्यांना पक्ष सोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.   


भाजप नेते समरजित घाटगे यांनी 23 ऑगस्टला बोलवला कार्यकर्त्यांचा मेळावा  आयोजित केला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला जात आहे.  शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांचा मेळावा होणार आहे. उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास नक्की असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मात्र, समरजितसिंह घाटगे यांनी याबाबत अधिकृत भाष्य केलेलं नाही. 


दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी समरजितसिंह घाटगे यांना घ्यायचं की नाही याचा निर्णय शरद पवार घेतील. अनेक नेते आमच्याकडे येऊं इच्छित आहे. त्याचं प्रोफाईल तपासूनच पक्षात प्रवेश दिला जाईल, असंही म्हटलं. 



संबंधित बातम्या : 


Samarjit Ghatge: कोल्हापूरच्या राजकारणातील मोठी बातमी, समरजीत घाटगेंचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित? 23 ऑगस्टला मेळावा


Samarjit Ghatge : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांना सांगूनच समरजित घाटगेंचा निर्णय? विधानपरिषदेची ऑफर पण मुश्रीफांच्या विरोधात लढण्यावर ठाम