कोल्हापूर : भाजपचे नेते समरजित घाटगे हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यांनी 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण त्यापूर्वी त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांना सांगून समरजित घाटगेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 


मंगळवारी दिवसभर समरजित घाटगे हे मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी बैठका घेतल्या. कागल विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातल्याची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सांगूनच समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचं जाहीर केल्याची चर्चा आहे. 


विधानपरिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक


कागलमधून हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असून ते राज्याचे मंत्रीही आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभेसाठी हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केलं. तेव्हापासून समरजीत घाटगेंच्या गटामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. 


अशातच जर जागावाटपात कागलची जागा भाजपला मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधानपरिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक असल्याची माहिती आहे.परंतु समरजीत घाटगे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. 


येत्या 23 तारखेला तुतारी फुंकणार? 


समरजीत घाटगेंना शरद पवारांनी ऑफर दिल्याची माहिती आहे. कागलमधून हसन मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी समरजित घाटगे उत्सुक असून येत्या 23 ऑगस्ट रोजी ते कागलमध्ये मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. प्रमुख कार्यकर्ते आणि  पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरापासून निरोप जायला सुरुवात झाली आहे. हा मेळावा कागलमधील शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार आहे. 


गुरुवारी महायुतीचा मेळावा होणार असून त्याला समरजित घाटगे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच समरजित घाटगेंचा प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हं आहेत.


ही बातमी वाचा :