बुलढाणा : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना देशातील नेते मातोश्रीवर (Matoshree) यायचे. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दरबारी नतमस्तक व्हायला जातात, हे अशोभनीय आहे, अशी टीका भाजप आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 


नुकताच उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सोनिया गांधी,  राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याचे समजते. यावरून आकाश फुंडकर यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. 


उद्धव ठाकरे दिल्लीला नतमस्तक होतात हे अशोभनीय


आकाश फुंडकर म्हणाले की, खर तर खूप वाईट वाटत आहे. बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे. बाळासाहेबांनी एक आवाज दिला की, संपूर्ण देश हलायचा. बाळासाहेब असताना देशातील नेते मातोश्रीवर यायचे. नतमस्तक व्हायचे. ती एक परंपरा होती. उद्धव ठाकरे हे दिल्ली दरबारी नतमस्तक व्हायला जातात हे अशोभनीय आहे. त्यांची मजबुरी त्यांनाच माहीत असेल, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 


संजय राऊतांमुळे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यात


आकाश फुंडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरदेखील टीकास्त्र डागले.  संजय राऊत यांनी भाजपची औकात काढण्याची त्यांची लायकी नाही. भाजपा-सेनेची युती तुटण्याचं खरं कारण राऊत आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे हाल होत आहेत. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना जर कुणी केल्या असतील तर या संजय राऊत नावाच्या दळभद्री माणसानेच केल्या, असे त्यांनी म्हटले आहे. 


बच्चू कडू यांच्याबद्दल न बोललेलं बरं 


प्रहारचे प्रमुख बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत आकाश फुंडकर म्हणाले की, बच्चू कडू यांच्याबद्दल मी न बोललेलं बरं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यांच्या बद्दल काय काय चर्चा होतात? त्यांना मंत्री केलं त्यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठी काय केलं? शेवटी त्यांना महायुती सरकार कामी आले. पण अवास्तव मागण्या करून ते महायुतीतून बाहेर पडतील तर बघितले जाईल. निवडणुका जवळ आहेतच, असे त्यांनी म्हटले. 


मनोज जरांगेंनी बाल हट्ट सोडावा


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आकाश फुंडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा समाजाचेच नुकसान होत असल्याचं आता समाजाच्या लक्षात आल आहे. EWS कोटा या आंदोलनामुळेच रद्द झाला. जे मराठा आरक्षण देणार नाही त्यांच्याच पायावर मनोज जरांगे नतमस्तक होतायत. हे सरकारच मराठा आरक्षण देईल. फक्त मनोज जरांगे यांनी 'बाल हट्ट' सोडला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा


काँग्रेसच्या दारात लोटांगण, बालिश, अर्धवटराव ते हिंदूची थट्टा, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल