मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला. नागपूरच्या राजभवन परिसरात 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कणकवली मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार बनलेल्या नितेश राणे यांना भाजपने मंत्रिपदावर बसवले. आमदार राणे हेदेखील भगवा कुर्ता परिधान करुनच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आले होते. शिवसेना पक्ष आणि राणे कुटुंबीयांचा वाद सर्वपरिचित आहे. त्यामुळे, खासदार नारायण राणेंसह नितेश व निलेश राणे (Nilesh Rane) हेही सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येतात. त्यातच, आता नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, त्यांचे भाऊ आमदार निलेश राणेंना शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. 


नितेश राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो शेअर करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. श्री उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं. पण, आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे, त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते. पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यानंतर थेट ठाकरेंवर हल्लाबोल चढवला. 


राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा, अशा शब्दात आमदार राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या, जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमचं अजून कठीण होईल, अशा असे म्हणत निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी, नितेश राणे यांचे मंत्रिपदाची शपथ घेतानाचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. 




हेही वाचा


मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ