पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं असून 132 जागांसह भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, महायुतीनेही 237 जागांवर विजय मिळवत मोठं बहुमत मिळवल्याने राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढाईत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निवडणूक लढवती. मात्र, मविआचा मोठा पराभव झाला असून शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे, देवाभाऊंनी दाखवून दिलं, देवाभाऊच महाराष्ट्राचे खरे चाणक्य अशी बॅनरबाजी देखील सोशल मीडियात पाहायला मिळाली. मात्र, बारामतीमधील असाच एक बॅनर वादग्रस्त ठरला असून बारामतीत झळकावलेला हा बॅनर एका अज्ञाताने पेटवल्याची घटना घडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीत लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने पेटवला आहे. बारामती नगर परिषदेसमोर लावलेला देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पेटवल्यानंतर तो अर्धा जळाला असून अर्धाच शिल्लक राहिल्याचं दिसून आले. बारामतीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख देखील केला होता. त्यामुळे, बारामतीमधील काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर, पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची लढाई म्हटल्यास शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातच होती, असा राजकीय कयास लावला जातो. त्यामुळे, महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करताना शरद पवारांवरही अनेकांनी टीका केली.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार हेच राजकीय चाणक्य असल्याचं महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून म्हटलं जात होतं. कारण, लोकसभा निवडणुकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. तसेच, त्यांचे 9 खासदार निवडून आले होते. तर, राज्यात महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही मविआला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, मविआचा दारुण पराभव झाला. त्यामुळे, महायुतीच्या विजयाचं श्रेय भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच दिले जात आहे. त्यातूनच देवाभाऊ, चाणक्य असा उल्लेख केला जात आहे. मात्र, बारामतीमधील चाणक्य नावाने त्यांचा झळकलेला बॅनर अज्ञातांकडून पेटवण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो उर्वरीत बॅनर खाली उतरवला.