बीड: भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सोमवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एक विचित्र योगायोग निदर्शनास आणून दिला. लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) निकाल 4 जून रोजी आहे. याच दिवशी मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेबांना अग्नी दिला. अनेक लोकांनी मला या विचित्र योगायोगाविषयी विचारले. मी त्यांच्याशी बोलून त्यांचे मन हलके केले. 4 जूनलाच लोकसभेचा निकाल का? त्याचं उत्तर चांगलं असावं, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.


मी मुंडे साहेबांना अग्नी दिला त्याचदिवशी म्हणजे 4 जूनला लोकसभेचा निकाल येणार आहे, या योगायोग नक्कीच आश्चर्यकारक आहे. एखादी व्यक्ती सत्कारासाठी येत असते, पण ती जिवंत येत नाही आणि आता त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी लोकसभेचा निकाल लागत आहे. हा योगायोग नक्कीच आश्चर्यकारक आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. माझं राजकीय जीवन हे लोकांच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे. माझ्या कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाहीत, अशी भावनाही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.



गोपीनाथ मुंडे यांचे दुर्दैवी निधन


देशात 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर दिल्लीतील एका अपघातामध्ये  राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. गोपीनाथ मुंडे हे 3 जून 2014 रोजी बीड येथील विजयी रॅलीसाठी दिल्ली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला होता. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव विमानाने महाराष्ट्रात आणण्यात आले होते. त्यानंतर परळी या मूळगावी गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 


 पंकजा मुंडे यांचे भवितव्य पणाला


पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर फेकल्या गेल्या होत्या.  भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशा चर्चा अनेकदा झाल्या. पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना राज्य पातळीवर कोणतीही मोठी संधी मिळू शकली नव्हती. मात्र, आता भाजपने त्यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ गेल्या दोन टर्ममध्ये भाजपकडे असला तरी यंदाची लढाई पंकजा मुंडे यांच्यासाठी अगदीच सोपी नाही. पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या आदल्या रात्री परळी येथील काळरात्री मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली होती.


मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग सर्वाधिक मराठवाड्याच्या पट्ट्यात जाणवली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरु शकतो. मराठा व्होटबँक सुप्तपणे मतपेटीतून आपला निषेध व्यक्त करु शकते. या मराठा फॅक्टरमुळे बीडची लढाई पंकजा मुंडे यांच्यासाठी काहीशी आव्हानात्मक मानली जात आहे. त्यामुळे बीड लोकसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना