पुणे: शरद पवार यांना  बारामतीमधून संपवण्याची भाषा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना अजित पवार यांनी गुरुवारी खडेबोल सुनावले होते. बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) हे निवडणुकीला उभे नव्हते, मग त्यांचा पराभव करण्याची चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भाषा योग्य नव्हती. मी त्यांना तसे स्पष्ट सांगितले आणि तुम्ही फक्त पुण्यातच प्रचार करण्याची सूचना दिल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील हे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. 


एरवी चंद्रकांत पाटील हे वादविवादाचा विषय येतो तेव्हा बिलकूल नमते न घेता आपली भूमिका कायमच ठामपणे मांडत असतात. पण अजित पवार यांनी जाहीरपणे खडसावल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी अद्याप मौन धारण केले आहे. ते गुरुवारी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी आलेले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना अजितदादांच्या टिप्पणीविषयी विचारणा केली. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी त्यावर चकार शब्दही न काढता मौन बाळगणे पसंत केले.


चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले?


महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा सपाटा लावला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नेते बारामतीध्ये चांगलेच सक्रिय झाले होते. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविरोधात दंड थोपटले होते.  त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, या बैठकीनंतर शरद पवार यांना  बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. 


चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची तेव्हा फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र, बारामती लोकसभेच्या प्रचाराचे मैदान तापल्यानंतर रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा व्हीडिओ सातत्याने बारामतीच्या मतदारांना दाखवला होता. शरद पवार यांच्यावर भाजपच्या हल्ल्याने केलेला अशाप्रकारचा हल्ला बारामतीकरांना रुचला नव्हता. त्यामुळे अजित पवार यांची कुठेतरी अडचण झाली होती. त्यामुळे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.


अजित पवार काय म्हणाले?


अजित पवार यांनी गुरुवारी शिरुर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो. नंतर आम्ही चंद्रकांत पाटील यांना म्हणालो की, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.


आणखी वाचा


तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं