चंद्रकांत पाटील कोथरुडमधून रिंगणात, भाजपचे पहिले 10 मतदारसंघ ठरले, 2 मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब: सूत्र
भाजपकडून 25 उमेदवारांची यादी तयारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारसंघ निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावला असून आजच महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केलंय. त्यानंतर, आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राजधानी दिल्लीत जाणार असून तेथे महायुतीमधील जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकीत महायुतीमधील 120 नावांवर अंतिम निर्णय होणार आहे. तत्पूर्वी भाजपकडून 25 उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली असून 10 मतदारसंघातील नावांवर शिक्कामोर्तबही झालं आहे. त्यानुसार, सध्याच्या सरकारमधील 6 विद्यमान मंत्र्यांना पहिल्या यादीतून गाळण्यात आलंय. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant patil) यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
भाजपकडून 25 उमेदवारांची यादी तयारी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारसंघ निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामध्ये, चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. मात्र, भाजपच्या या पहिल्या यादीतून 6 विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच, उमेदवारांच्या नावाची घोषणा पुढील 2 दिवसांत होण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे केवळ 15 दिवसांचाच कालावधी उरला आहे. त्यामुळे, उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मतदारसंघात प्रचारफेरी आणि सभांची व मतदारांपुढे जाऊन मतदानाचे आवाहन करण्यासाठीची तयारी उमेदवारांना अल्पावधीतच करावी लागणार आहे.
राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर होणार असून वंचित बहुजन आघाडी व राज ठाकरेंच्या नेतृत्वातील मनसेनंही उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडून काही मतदारसंघात उमेदवारांनी नावे पुढे आली आहेत. तसेच, महाविकास आघाडीकडूनही काही मतदारसंघात उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. मात्र, अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात मनसे व वंचित बहुजन आघाडीनेच आघाडी घेतल्याचं दिसून येतं. मनसेनं आत्तापर्यंत 7 मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीने 21 मतदारसंघात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यातच, आता भाजपकडून 10 मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.
10 मतदारसंघात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
नंदूरबार - विजयकुमार गावित
नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कोथरुड - चंद्रकांत पाटील
धुळे ग्रामीण - सुभाष भामरे
धुळे शहर - अनुप अग्रवाल
रावेर - हरीभाऊ जावळे
भुसावळ - संजय सावकारे
जळगाव - सुरेश भोळे
शहादा - राजेश पाडवी
सिंदखेडा - जयकुमार रावल
हेही वाचा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट