मुंबई: भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठी खूप मोठा विजय मानला जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना आपला संताप व्यक्त केला. आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही, अमरावती लोकसभेच्या (Amravati Loksabha) निकालात आता आम्ही दाखवून देऊ, असा गर्भित इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.


भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे. आता आम्ही आमचं काम करु. नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील. आता कोणाकडे नाराजी मांडण्याचा प्रश्न येत नाही. सध्या तरी आम्ही अमरावतीपुरता विचार करु. महायुती आणि विशेषत: भाजपला आमची गरज नाही. त्यामुळे आता आम्ही पुढील विचार करु सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेऊ. नवनीत राणा यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. आमचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करु शकत नाहीत. आम्ही नवनीत राणा यांच्यासाठी काम केले तर आमचा पक्षच अडचणीत येईल. भाजपने त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार बिलकूल करणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.


अमरावती लोकसभेच्या निकालात आम्ही दाखवून देऊ: बच्चू कडू


अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्याविरोधात आमच्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवून फायदा होईल की नाही, याचा आढावा आम्ही घेऊ. पण अमरावतीचा कौल हा नवनीत राणा यांच्याविरोधात असेल. नको तिथे रंगबाजी, दुसऱ्यांचे श्रेय हिसकावून घेणे, या  गोष्टी नवनीत राणा यांच्याविरोधात जातील. महायुतीला अमरावतीच उमेदवार ठरवताना आमच्याशी चर्चा करण्याची गरज वाटली नाही. हा भाजपचा मूळ स्वभाव आहे. पण आम्ही अमरावतीच्या निकालावेळी आमची नाराजी दाखवून देऊ, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.


आणखी वाचा


अमरावतीमधून भाजपकडून नवनीत राणाचं नाव जाहीर; शिवसेना, बच्चू कडू आणि स्वपक्षीयांचा विरोध डावलून संधी