Bihar Floor Test : नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारमध्ये (Bihar) भाजपची साथ सोडत आरजेडीसोबत (RJD) घरोबा केला आणि ताबडतोब बिहारमध्ये केंद्रीय चौकशी यंत्रणा सक्रिय झाल्या. आज (24 ऑगस्ट) नितीश सरकारची बिहार विधानसभेत बहुमत चाचणी (Bihar Floor Test) होती, त्याच दिवसाचा मुहूर्त साधत सकाळपासून सीबीआय धाडसत्र सुरु झालं. सुरुवातीला एक दोन नेत्यांवर धाडी सुरु असल्याचं कळलं. नंतर हा आकडा वाढतच गेला. बिहारमध्ये पाटणा, मधुबन ते झारखंडमधल्या रांचीपर्यंत 24 ठिकाणी धाडी सुरु होत्या. बिहारमध्ये या धाडसत्रातच आज विधानसभेत नितीश कुमार सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. 


कोणाकोणावर धाडी? 
- सुनील सिंह, सुबोध राय, फैयाज अहमद, अशफाक करीम या राजदच्या आमदार तसंच खासदारांवर निवासस्थानी धाड
- पाटण्यासह बिहारमध्ये अनेक ठिकाणी सीबीआयने ही धाड टाकली
- नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा हा आरोप आहे
- लालू प्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वेमंत्री असतानाच्या काळात म्हणजे यूपीए 1 च्या काळातला हा आरोप आहे.


या धाडीनंतर ही चौकशी यंत्रणांची धाड नव्हे तर भाजपची धाड असल्याचा आरोप आरजेडीचे खासदार आणि प्रवक्ते मनोज झा यांनी केला


आज बिहारमध्ये एकीकडे या धाडी सुरु झाल्या, तर दुसरीकडे विधानसभेत नव्या सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. आज सकाळीच विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा जे भाजपचे नेते होते त्यांनी राजीनामा दिला आणि नितीश सरकारचं काम सोपं झालं. तसंही 243 सदस्यांच्या विधानसभेत 121 हा बहुमताचा आकडा असताना नितीश-तेजस्वी यांच्याकडे एकूण 164 आमदार आहेत. 


महाराष्ट्र, बंगालमध्ये केंद्रीय चौकशी यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून कशा सक्रिय आहेत हे आपण पाहत आहोतच. त्यात आता बिहारमध्ये भाजपचं सरकार गेल्यानंतर या यंत्रणांचा मोर्चा तिकडेही वळला आहे. तेजस्वी यादव यांच्या गुरुग्राममधल्या मॉलमधेही चौकशी पथकं पोहचली. 


चौकशी यंत्रणांचा महाराष्ट्राच्या राजकारणात शस्त्रासारखा वापर झाल्याचा आरोप होत असतो. बिहारमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी कुठे ईडी-सीबीआयच्या छाप्याची बातमी येत नव्हती. पण नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडली आणि इथेही आता चौकशी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. आता बिहारमध्येही हाच खेळ सुरु झाला असेल तर त्याचा पुढे राजकीय परिणाम कसा होतो हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या


Bihar Politics : बिहारमध्ये आणखी उलथापालथ होणार, प्रशांत किशोर यांचं भाकित, नितीश कुमारांवर निशाणा