CBI raids In Bihar :  बिहारमध्ये  (Bihar) राजकीय दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) सरकारच्या वतीनं बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रीय जनता दलाच्या पाच नेत्यांच्या घरांवर सीबीआय (CBI) ने छापे टाकले आहेत. यासोबतच लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांचे खासगी सचिव नागमणी यादव यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. त्यामुळं बिहारमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.


नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रीय जनता दलाच्या पाच नेत्यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये सुनील सिंग, अश्फाक करीम, फय्याज अहमद, सुबोध राय (माजी आमदार आरजेडी) अबू दोजाना या नेत्यांच्या घरावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत.


या नेत्यांच्या घरावर सीबीआयचे छापे


सुनील सिंग


आरजेडी नेते सुनील सिंह यांच्या घरी सीबीआयची टीम दाखल झाली आहे. सुनील सिंह यांनी हा छापा म्हणजे भाजपचा कट असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या इशाऱ्यावर हा छापा टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. माझ्या घरात जर काही मिळाले नाही तर, सीबीआयवर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.


डॉ. फयाज अहमद 


राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार डॉ. फयाज अहमद यांच्या घरावर केंद्रीय यंत्रणा असलेल्या ईडीचे (ED) छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून ही छापेमारी सुरु आहे. या छाप्यात सुमारे 45 जणांची टीम आहे. डॉ. फयाज अहमद हे राजदचे माजी आमदार आहेत. सध्या ते राजदच्या कोट्यातून राज्यसभा खासदार आहेत.


अशफाक करीम


आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरावरही सीबीआयने छापे टाकले आहेत. याआधीही अश्फाकच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात त्यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सुबोध राय


आरजेडी नेते आणि माजी आमदार सुबोध राय यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. सुबोध रॉय हे आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या खूप जवळ मानले जातात. 


अबू दोजाना


आरजेडीचे  माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही सीबीआयने छापे टाकले आहेत. त्याचवेळी, ताज्या अपडेटनुसार, पाटणासह एकूण 24 ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. आजपासून बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन आज आणि उद्या असे दोन दिवस चालणार आहे. यादरम्यान नितीश सरकारची बहुमत चाचणी होणार असून, राष्ट्रपतींविरोधातील अविश्वास प्रस्तावावर दुसरे मतदान होणार आहे.