Bihar Cabinet Expansion : बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये पहिल्या विस्तारात 31 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत महाआघाडी करून नितीश कुमार यांनी सरकार स्थापन केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा राजभवनात शपथविधी पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी प्रथम पाच आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. आरजेडी 16, जेडीयू 11 आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी आज शपथ घेतली. शपथविधीनंतर खादेवाटप देखील जाहीर झाले असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृहमंत्रालय स्वत: कडे ठेवले असून तेजस्वी यादव  यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. तेज प्रताप हे वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री असतील.  






नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात विजय कुमार चौधरी, तेज प्रताप यादव, बिजेंद्र यादव, आलोक मेहता आणि अफाक आलम यांना प्रथम एकाचवेळी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 


विजय कुमार चौधरी
विजय कुमार चौधरी जेडीयूमधून मंत्री झाले आहेत. चौधरी हे मागील सरकारमध्येही शिक्षणमंत्री होते. बिजेंद्र यादव यांनीही शपथ घेतली आहे. ते सुपौलचे आमदार आहेत.


आलोक मेहता
आलोक मेहता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आलोक हे उजियारपूरचे खासदार आणि बिहार सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. आलोक मेहता यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून ते 7.36 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. 


तेज प्रताप यादव 
लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेज प्रतापने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांच्याकडे 2.83 कोटींची संपत्ती आहे.


अफाक आलम 
अफाक आलम काँग्रेसमधून मंत्री झाले आहेत. अफाक हे पूर्णिया जिल्ह्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत. कसबा मतदारसंघातून ते चार वेळा आमदार राहिले आहेत.


दुसऱ्या फेरीत अशोक चौधरी, श्रवण कुमार, सुरेंद्र यादव, लेशी सिंग आणि रामानंद यादव यांनी शपथ घेतली. तिसऱ्या फेरीत पुन्हा पाच आमदारांनी शपथ घेतली आहे. या पाच आमदारांमध्ये मदन साहनी, ललित यादव, संजय झा, संतोष सुमन आणि कुमार सर्वजीत यांचा समावेश आहे. चौथ्या फेरीत पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शीला मंडल, सुमित सिंग, सुनील कुमार, चंद्रशेखर आणि समीर महाशेख. पाचव्या फेरीत अनिता देवी, सुधाकर सिंग, मो. जामा खान, जितेंद्र राय आणि जयंत राज यांनी शपथ घेतली तर सहाव्या फेरीत इस्रायल मन्सूरी, सुरेंद्र राम, कार्तिक सिंग, मुरारी प्रसाद आणि शाहनवाज आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  




बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पासून वेगळे होण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत युती केली. मित्र पक्षांच्या 164 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री जीतन राम माझी यांच्या हिंदुस्थानी अवामी मोर्चानेही नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. त्यात चार आमदार आहेत. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.