मुंबई : लोकसभा निवडणुकांची सांगता होताच राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार, 26 जून रोजी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार असून 1 जुलै रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्ष पुन्हा निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी, उमेवारांची चाचपणी सुरू असून मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारही जाहीर केला आहे. मनसेनंतर,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटानेही मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवार घोषित केला. राष्ट्रवादीने (NCP) शिवाजी नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. आता, मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादीच्या उमदेवारीनंतर भाजपाने (BJP) निवडणुकांसाठी इच्छुक असल्याचं दाखवून दिलंय. 


मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनिल बोरनारे यांनी उमेदवारीसाठी 2 अर्ज घेतले आहेत. बोरनारे यांनी एक अर्ज भाजपाच्या नावे तर दुसरा अपक्ष म्हणून घेतला आहे. त्यामुळे, या मतदारसंघातील चुरस आणखीनच वाढली आहे. कारण, महायुतीकडून एकाच पक्षातील उमेदवारास ही निवडणूक लढता येणार आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस अगोदरच आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 


भाजपाकडून मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार शिक्षक नेते व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी आज निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये एक अर्ज भाजपाच्या नावाने असून दुसरा अपक्ष म्हणून घेतला आहे. त्यामुळे, अनिल बोरनारे निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.या उलट बोरनारे यांनी अर्ज घेतल्यामुळे महायुतीमध्ये आता बंडखोरी होणार का? अशी चर्चा महायुतीच्या तिन्ही पक्षात व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


कपिल पाटील महाविकास आघाडीकडून तयारीत


मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, महायुती व महाविकास आघाडीचे नेतेमंडळी व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यातच, अगोदर महायुतीतील मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर, राष्ट्रवादीने मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे. आता, भाजपच्या अनिल बोरनारे यांनीही अर्ज नेला आहे. तर, या मतदारसंघात कपिल पाटील महाविकास आघाडीकडून इच्छुक व तयारीत आहेत.


कोण आहेत राष्ट्रवादीचे शिवाजी नलावडे?


शिवाजी नलावडे हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. नलावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले. शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक व जिल्हाध्यक्ष राहिलेले असून, महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीमध्ये त्यांचे मोगदान मोलाचे राहिलेले आहे. गेले ३० वर्षे आशिया खंडातील अग्रस्थानी नसलेली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. मुंबई शहरात 2 शाळा उभारण्यात त्यांचा सहभाग असून शिक्षण मित्र म्हणून ते परिचित आहेत.