नाशिक : राज्यात गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या (Nashik Loksabha) जागेचा तिढा अखेर सुटला असून नाशिकची जागा आपल्या पदरात पाडण्यात शिवसेनेला यश आले आहे. नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता, त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या जागेवर दावा केला होता. मात्र, काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे, बुधवारी भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड 1 तास चर्चा झाली. त्यानंतर, नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. अखेर विद्यमान खासदार शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत झालेल्या खलबतानंतर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिक स्वतःकडे खेचण्यात मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत रंगणार आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या राजाभाऊंनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यामुळे, आता हेमंत गोडसे यांना पायाला भिंगरी लावून पुढील 18 ते 19 दिवस प्रचाराच्या मैदानात उतरावे लागणार आहे. तसेच, पुढील 18 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी त्यांची मोठी धावपळ होणार आहे. 


नाशिकमध्ये गिरीश महाजन व छगन भुजबळ यांच्यात महायुतीच्या जागेसंदर्भात बैठक पार पडली. परंतु उमेदवार कोण याबाबत इथे चर्चा झालेली नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय होईल, असे महाजन यांनी म्हटले होते. 


भुजबळांची नाराजी दूर


नाशिकमधून उमेदवाराची घोषणा होत नसल्यानेछगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, गिरीश महाजन यांच्यासमवेत भेट झाल्यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की,  भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना नाशिकबाबत खडा अन् खडा माहीत आहे. महायुती म्हणून आपण मैदानात तयार आहेत. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही, असे महाजन यांनी म्हटले होते. 


हेही वाचा


Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार हालचाली, महाजनांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर