नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री पदावरुन आपण दूर होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला. भाजपच्या (BJP) नेत्यांनीही फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता. आता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी याबाबत थेट आदेशच दिला आहे. 


तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईस, असे अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे, कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते. फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्लाच अमित शाह यांनी फडणवीसांना दिला. 


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती केल्यानंतर आजच्या अमित शाहांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्या विनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असल्याचे दिसत आहे.


दिल्लीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक


राजधानी दिल्लीत आज भाजपप्रणित एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच घटकपक्षांनी मोदींच्या नेतेपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे, नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित झालं आहे. येथील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पराभवाच्या अनुषंगाने व पुढील मंत्रीमंडळ विस्ताराच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. 


हेही वाचा 


बारामती-बीडच्या जागा कशा पडल्या, महाराष्ट्रातील जागा का घटल्या; प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील घरी अजित पवार-फडणवीसांची खलबतं