CM Mamata Banerjee Security: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर येत आहे. शनिवारी उशिरा रात्री बॅनर्जी यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी एक अज्ञात व्यक्ती घुसून लपून बसला होता. मात्र रविवारी पहाटे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. त्याला स्थानिक कालीघाट पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. भिंत चढून उच्च सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस त्याने कोणत्या उद्देशाने केले, याची पोलीस चौकशी करत आहेत.


चौकशीला सामोरे जाताना या इसमाने कबुली दिली की तो सीमा भिंत चढून दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसला आणि रात्रभर लपून बसला. भिंत चढून, तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा  देऊन आणि तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधूनही ही व्यक्ती निसटून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात कशी घुसली, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.


तैनात पोलिसांचा निष्काळजीपणा


नुकतेच या परिसरात एका वृद्ध जोडप्याची हत्या करण्यात आल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर तेथे बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नसल्याचे समोर आले. तेथे तैनात असलेल्या पोलिसांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शहर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: