BJP National Executive Meeting : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसांच्या मंथन शिबिराचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यकारिणी बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत बोलताना अमित शाह म्हणाले की, पुढील तीस ते चाशीळ वर्ष देशात भाजपचं युग असेल.
हैदराबाद येथील भाजपच्या कार्यकारणी बैठकीला भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी सहभाग दर्शवला होता. मंथन शिबिरात भाजपशासित 19 राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, 'पुढील 30 ते 40 वर्ष देशात भाजपाचं युग असेल. यादरम्यान भारत विश्वगुरु होईल.' घराणेशाही, वर्णद्वेष आणि तुष्टीकरण या देशातील राजकारणासाठी एकप्रकारे अभिशाप होता, जो देशातील लोकांच्या दुखाचं कारण होता, असेही शाह म्हणाले.
तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील राज्यात असलेली कौटुंबिक राजवट भाजपा संपवेल. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशासह अन्य राज्यात भाजपा सत्तेत येईल. 2014 पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यातील सत्तेपासून दूर आहे, अशी खंत अमित शाह यांनी कार्यकारणीच्या बैठकीत सांगितली.
दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जकिया जाफरी यांची याचिका कोर्टाने फेटाळळी, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णायाला अमित शाह यांनी ऐतिहासिक म्हटलेय. ही याचिका 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीबाबत होती. ही याचिका तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह 64 जणांविरोधात एसआयटीने दिलेल्या क्लीन चीटच्या विरोधात होती. दरम्यान, अमित शाह असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान शंकराप्रमाणे त्यांच्यावर भेकलेल्या सर्व विषाला पचवतात.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, या कार्यकारणी बैठकीचा मुख्य उद्धेश पक्षाचा विस्तार करणे असू शकतो. तेलंगणामधील भाजपचे प्रवक्ता एन.वी. सुभाष म्हणाले की, 18 वर्षानंतर हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. दरम्यान, या अगोदर 2004 मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये झाली होती. पुढच्या वर्षी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. ‘मिशन दक्षिण’ अजेंड्याखाली भाजपा दक्षिण भागातील अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
रविवारी पंतप्रधान आंध्रप्रदेशातील भीमावरमला भेट देणार -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची न्याय्य दखल घेऊन त्यांच्याबद्दल देशभरातील लोकांना जागृत करण्याबद्दल कटीबद्ध आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान आलुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटी कांस्यपुतळ्याचे अनावरणही करतील. 4 जुलै 1897 रोजी जन्मलेले अलुरी सीतारामा राजू यांचे स्मरण पूर्व घाटांतील आदिवासी जमातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढ्यासाठी केले जाते. 1922 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राम्पा बंडांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांचा उल्लेख स्थानिकांकडून मन्यम वीराडु (जंगलांचा नायक) म्हणून केला जातो.