Bhiwandi Lok Sabha Constituency : भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पक्षाकडून भिवंडीतून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election From Bhiwandi) सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Balyamama Mhatre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर होऊन 24 तासही होत नाहीत, तोपर्यंत बाळ्यामामांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच, म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई करण्याचा घाट घालण्यात सुरुवात झाली आहे. येवई येथील आरकेलॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए पुढे सरसावली आहे. एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून लढा; बाळ्यामामा म्हात्रेंचं कपिल पाटलांना खुलं आव्हान
कारवाईबाबत बोलताना बाळ्यामामा म्हात्रे यांनी भिवंडीतील विद्यमान आमदार कपिल पाटलांवर निशाणा साधला आहे. जिनके घर शिशेक होते है, वो दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते. पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून लढा, असं म्हणत सुरेश म्हात्रेंनी भाजप उमेदवार कपिल पाटलांवर निशाणा साधला आहे.
संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनानं अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षीत करण्यासाठी प्रस्ताव दाखल आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत, असं स्पष्टीकरणही यावेळी बाळ्यामामा म्हात्रेंनी दिलं आहे. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून 90 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
शरद पवार गटाकडून बाळ्यामामा म्हात्रे रिंगणात
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपनं विद्यमान खासदार कपिल पाटील केंद्रीय मंत्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. परंतु, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्याप्रमाणे सांगलीत वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेमध्ये देखील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढत लढवायची असेल, तर मी मैत्रीपूर्ण लढत लढायला तयार आहे. तसेच, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये संगनमत झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्यास देखील तयार असल्याचं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :