Bhaskar Jadhav on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून चूक केली, असं मोठं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केले आहे. भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे सुरुवातील शिवसेनेत होते. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, आता त्यांनी शरद पवारांना सोडून चूक केली, असे विधान केले आहे.
शरद पवारांना सोडून मोठी चूक केली
भास्कर जाधव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती असे म्हटले होते. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे मला काही चुकल्यासारखं वाटतंय, असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. मी तो निर्णय घेतला तो चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो आहे. तेथे मी लपूनछपून काही बोललो नाही. पण, याचा अर्थ मला त्याची खंत वाटते आहे, असं नाही, अशी कबुली त्यांनी गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबीरानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.
आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. तेव्हाही बोललो, आजही बोलतो आणि उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं? याचं कारण कोणाकडे असेल तर त्यांनी स्पष्ट करावं. परंतू नाही मिळालं, म्हणून रडत बसायचं नाही तर लढायचं. मी रडत बसलो नाही. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे फुटून गेले, त्यांच्यासोबतही मी गेलो नाही. मी लढतोय, नाही मिळालं ते नाहीच मिळालं. कार्यकर्ते कमी होतायत म्हणून निवृत्ती घेण्याचं कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलोय. आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा, असं वाटतं, असे म्हणत त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले.
संजय राऊतांबाबत भास्कर जाधव म्हणाले...
संजय राऊत नेहमी मला सावरण्याची भाषा करतात. पण मी भाषणासाठी संधी मिळत नाही, म्हणून नाराज आहे, असं अजिबात नाही. सगळ्या गोष्टींचं मला पूर्ण भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसं होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
आणखी वाचा