Sanjay Raut on Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले असून, "आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं," असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच, "संजय राऊत (Sanjay Raut) प्रत्येकवेळी मला सावरण्याची भाषा करतात," असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली. या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत? 

2022 साली आमदार फुटून जायला नको हवे होते, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत? खासदार फुटून जावेत? कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं ते उदाहरण देत आहे. ते बरोबर आहे. पण, तरी तरीही अडीच वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना स्वतःच्या तोंडात गद्दारीचं शेण भरायचं आहे ते थांबणार नाहीत. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, पोलीस यांचा दबाव आहे. त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतः अनेक बैठकांना हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणे वेगळी होती. 

गुलाबराव पाटलांच्या खात्यात 50 कोटी जमा झाले होते

प्रत्येकाचा आजार वेगळा होता, हे मला माहित आहे. उदाहरणार्थ गुलाबराव पाटील. त्यांच्या खात्यात 40 ते 50 कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते. त्यामुळे मला ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते, या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, त्यांना विचारा. त्यांच्या बँकेच्या खात्यात जी रक्कम जमा झाली, त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि त्यामुळे मला अटक होईल, त्यामुळे मला जावं लागेल, असे सांगणारे हे पाटील होते. या भ्रष्टाचाराच्या कॅन्सरला तुम्ही काय करणार? भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे आमदार आणि खासदार सोडून गेलेत. भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आणखी वाचा 

आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांवरही स्पष्टच बोलले