रत्नागिरी:  भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. या राड्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. चिपळूण येथील भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला. निलेश राणे (Nilesh Rane) याठिकाणी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.  यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राड्याला सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर पिटाळले. मात्र, यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या.


दगडफेक होताच निलेश राणे संतापून गाडीतून खाली उतरले


निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरात आला. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि मारामारी झाली. भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. यादरम्यान एक दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने निलेश राणे संतापले.  त्यांनी गाडीतून खाली उतरून भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा राडा होण्याची चिन्हे दिसत होती. अखेर कार्यकर्त्यांनी समजूत घातल्यानंतर निलेश राणे गुहागरमध्ये सभेच्या दिशेने रवाना झाले. मात्र, आता सभा संपल्यानंतर निलेश राणे पुन्हा याठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे आज रात्री चिपळूणमध्ये पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.


पोलीस यंत्रणेच्या अपयशामुळे राडा?


गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांच्या गुहागरमधील सभेची जोरदार जाहिरातबाजी केली जात होती. सोशल मीडियावर या सभेचे टिझर प्रदर्शित केले जात होते. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी होऊ शकते, अशी शक्यता होती. त्यादृष्टीने या भागात पोलीस कुमकही तैनात करण्यात आली होती. भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यात जुने वैर आहे. त्यामुळे आज राडा होण्याची शक्यता असूनही पोलिसांनी चिपळूणमध्ये पुरेशी खबरदारी घेतली. पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरच निलेश राणे यांचे स्वागत करण्याची परवानगी भाजप कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळेच भास्कर जाधव गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्याचे पर्यवसन राड्यात झाले, असे सांगितले जात आहे. 


१२ वर्षांपूर्वींच्या त्या सभेमुळे राणे-जाधवांमध्ये वाद


तब्बल १२ वर्षांपूर्वी चिपळूणच्या सावर्डे गावात भास्कर जाधव यांची सभा झाली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी पहिल्यांदा नारायण राणे यांचा उल्लेख 'कोंबडीचोर' असा केला होता. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये वैर निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी कणकवलीत झालेल्या सभेतही भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे भास्कर जाधव आणि राणेंमधील हा वाद सध्या तापला आहे.


आणखी वाद


निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूणमध्ये दगडफेक, भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा