Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. अशातच काँग्रेस नेते जयराम रमेश भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल करत म्हणाले की, भारत जोडो यात्रा केवळ भाजपच्या कथित फूट पाडण्याच्या राजकारणाच्या विरोधात नाही, तर देशभरातील पक्ष संघटनेला पुन्हा नव्याने जोडण्याचे देखील आहे. जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूतील कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर या 3,570 किमीच्या प्रवासात सामान्य लोकांच्या समस्या ऐकतील. ते म्हणाले, ही नवी आणि आक्रमक काँग्रेस आहे. जी जनतेशी जोडली जात आहे.


अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींच्या कपड्यांबाबत केलेल्या टिप्पण्यांवर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, "हे एका पक्षाचे बालिश आणि मूर्खपणाचे कृत्य आहे. जे या दौऱ्यामुळे निराश झाले आहेत. आम्हाला ध्येयापासून विचलित करणे हा त्यांचा हेतू आहे. आम्ही झुकणार नाही. आमचे लक्ष विचलित होणार नाही."


जयराम रमेश म्हणाले की, ही यात्रा कोणतीही विधानसभा निवडणूक किंवा 2024 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढली जात नाही. त्यांनी आरोप केला की, "आम्ही 'जोडण्याचे काम करत आहोत, कारण कोणीतरी तोडण्याचं काम करत आहे. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे तुकडे करण्याची योजना आखली आहे. तर काँग्रेसने देश एकत्र आणण्याची योजना आखली आहे. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविधता नाकारली, म्हणून आम्ही हा प्रवास सुरू केला आहे.''


प्रेम आणि आपुलकी पसरवणे, हे आमचे ध्येय आहे : केसी वेणुगोपाल


काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, ''गांधींच्या कपड्यांबद्दलच्या टिप्पण्यांवरून हे दिसून येते की ज्या पक्षांना काँग्रेस नष्ट करायची आहे, त्यांच्यासाठी भारत जोडो यात्रा अडचणीची बनली आहे. आमचा हेतू अगदी स्पष्ट आहे. प्रेम आणि आपुलकीचा प्रसार करताना भीती आणि द्वेषाचा प्रसार थांबवण्याचा आमचा हेतू आहे.”


वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधी विझिंजम बंदर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांशी संवाद साधतील. तसेच के-रेल्वेविरोधी आंदोलन आणि राज्यातील इतर अशा आंदोलनांच्या नेत्यांशीही ते संवाद साधतील. यानंतर राहुल गांधी भारत जोडी यात्रेच्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला समाजसुधारक अय्यंकाली, चटम्पी स्वामीकल आणि श्री नारायण गुरु यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील.